Saturday, 7 February 2015

अजून येतो वास फुलांना .....

                                                                               Akashwani Ahmednagar, March  2010
                                                                               Dainik Lokmat, 24 Nov.2014


    परवाच्या सायंकाळी माधव भेटला तेव्हाची गोष्ट- दिवस मावळला तसा चेहऱ्यावरचा आनंदही मावळला होता त्याच्या. कारण विचारलं तर अस्वस्थ होऊन बोलत राहिला -  यार भीती वाटते या बदलत चाललेल्या जगाची, प्रगती म्हणता-म्हणता आपण इतके दूर गेलो कि कुठे पोहोचायचंच राहून गेलं. किती यंत्रवत वाटतं हे जगणं.आपल्या निरागस स्वप्नांची धडधड ऐकूच येत नाही त्याला!                          
   अजूनही बरंच काही, पण अर्थपूर्ण सांगून गेला तो; आणि तो गेल्यावर मीही तसाच अस्वस्थ झालो. आठवत राहिलं जुनं जग, अन आमच्या अंगणातल्या मातीत पेरलं गेलेलं बालपण...पारिजातकाच्या फुलांसारखं अलगद वेचून ओंजळीत घ्यावं  तसंच आणि तितकंच निरागसतेनं वाहत गेलेलं. भोवतालची हवासुद्धा निष्पाप असायची तेव्हा; केवळ श्वासापुरतीच जवळ येणारी अन माणसंही होती फक्त माणसांसारखीच !
 त्याच्या बोलण्यानं उगाच दंश केला मनाला. मग बोलत राहिलो स्वतःशीच. नंतर वाटलं, जग नाही यार खरं तर आपणच बदलत चाललोय...! या निसर्गाचा एक प्रवाह आहे..स्वच्छ सुंदर हवा- नेहमीच खेळणारी, नितळ - निळसर आकाश...सुर्य तोच जो जगाच्या अस्तित्वापासून आहे...तेच तारे, तोच समुद्र, डोंगर-दऱ्या, नदी - नाले  अन तीच प्रवाळ बेटं..सारं कसं सौम्य पणानं वाहतं आहे. जग आहे तसंच आहे - बदलत चाललोय ते आपण. माणसाच्या आतला माणूस बदलत चाललाय, कारण जगणं थांबवून मगच जगायला सुरुवात केलीय त्यानं. झाडं तोडली उंचच उंच इमारती बांधल्या पण घरत राहणारी माणसं दुरावत चालली. सर्वांना एकत्रित आणण्याचे कार्यक्रम आजही राबवतोय आम्ही पण हस्तांदोलन करताना मनात होणारा आनंद हरवला..माणसांची गर्दी खूप वाढली पण माणुसकी कमी होत गेली. टि.व्ही. वरचे चित्रपट - मालिका बघता-बघता जगण्याचाही फक्त अभिनयच करू लागलो आपण; पण वास्तवातलं जगणं विसरून गेलो. पहिलं बाजारातही एखादा मित्र भेटला तर अतोनात आनंद व्हायचा त्याला अन मलाही, आता भेटण्यासाठी घरी गेलो तरी त्याला आपल्या भेटीत रुची नसते- हव्यास जडलाय आपल्याला फक्त पैशांचा, संपत्तीचा अन माणसांपासून माणसं दूरवण्याचाही !
   कुठेतरी एका विचारवंत लेखकानं म्हटलं आहे- people becomes miserable because they constructs a wall instead of bridges अर्थात माणसं दु:खी होतात कारण ते एकमेकांना जोडणारे सेतू  बांधण्याऐवजी एकमेकांपासून एकमेकांना दूर करणाऱ्या भिंती रचतात. हाच बदल झाला आपल्या जगण्यात. एकमेकांना घास भरविण्या ऐवजी  आपण एकमेकांचे घास ओरबाडू लागलो, परिणामी आपुलकी दूरच राहिली पण आमच्यात जगण्याचीही स्पर्धा सुरु झाली...आम्ही कुठल्यातरी खोट्या अविर्भावात जगात आलो- खूप प्रगती केली आम्ही, नवनवीन शोध लावलेत, नवी तंत्र विकसित केली, रोबोट तयार केले..पण माणसाच्या भावनांचं

काय? मुलांची लग्न जमवितानाही आम्ही व्यवहारच केला. पण त्यांना खरंच प्रेम मिळालं का हे विचारलं देखील नाही. म्हणूच कदाचित, आज आमची स्पर्धा सुरु आहे ती एका अवास्तव जगाशी. मिटलेल्या पापण्यांत सुंदर-सुंदर जगण्याची स्वप्ने रंगवताना आम्ही नेहमीचंच मिटवून घेतलं स्वतःला. विज्ञानाची सांगड घालून नवनवीन शोध लावलेत आम्ही पण प्रेयसीला घेऊन नदी-किनारी निवांत फिरावं इतकी निरागसता हरवून बसलो. लहानपणात आजोबांसोबत देवासामोरची घंटा वाजविण्यासाठी धरलेला अट्टाहास जुन्या पिढीच्या स्मरणात राहील पण आताच्या पिढीतले आजोबाच निवृत्त झालेत त्यांना कोठून मिळणार अजोबंसोबतचं देऊळ आणि घंटानाद ? आमच्या वेळी परीक्षेला सामोरं जाताना रात्र - रात्र वितळवून डोक्यावर घेतल्या आम्ही, पण आताची पिढी सुपरव्हायजरशी सेटिंग करण्यात आपली गुणवत्ता खर्च करताना दिसते हि शोकांतिका आहे. खरं म्हणजे आम्हाला रंगी-बेरंगी फुलपाखरांसारखं जगणं अपेक्षित होतं, पण आमच्या आयुष्याचाच  बेरंग होत चाललाय अन आता तर हि दुनियाच आम्हाला रंगहीन वाटू लागलीय..कधी काळी एखाद्या नाटक - चित्रपटातल्या खलनायकाच्या पात्राला तोंड भरून नावं ठेवायचो आम्ही पण आता आमच्यातला प्रत्येकजण या दुनियेच्या रंगभूमीवर खलनायक होवू पाहतोय आणि यापेक्षा एक घोर कटू सत्य  हे कि कोणाच्याच प्रामाणिकपणाला दाद देण्याची धमक आमच्यात राहिली नाही, हीही एक शोकांतिकाच आहे.  
   या वास्तवाचं चिंतन करतानाच मला एक बदल प्रामुख्याने जाणवतो तो म्हणजे माणसाच्या आतला माणूस बदलत चाललाय आणि प्रत्येकजण हेच म्हणतोय कि जग बदलत आहे...नाही. दोस्तहो ..अजूनही सांगतो...तेच तारे, तीच हवा..तेच आकाश...समुद्रही तोच आहे...अजूनही पक्षी घरट बांधून राहतात...जनावरं चारच खातात , देवळातल्या घंटेचा नाद आजही मधुरच आहे..आईचं  प्रेम आजही अवीट आहे..दोस्तांनो आयुष्य  बदलत आहे...आयुष्य बदलत आहे..शेवटी कविवर्य मर्ढेकरांनी म्हटलंय -

अजून येतो वास फुलांना ..
अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढुनी 
अजून बकरी चारा खाते...

                                                                                                       -  कृष्णा बेलगांवकर 

मनाच्या गाभा-यातून...

                                                                                              Dainik Lokmat,Ahmednagar August 2014 
      
      खिडकीतून थंडगार हवेचा झोत आल्यानं अचानक जाग आली. रात्रीचे दोन वाजले - गाडीनं नुकतंच सातारा शहर मागे टाकलं होतं. रस्त्यावर कोसळणारा पाऊस छेदत गाडी बेफाम वेगानं कोल्हापूरकडे निघाली. पावसाचा गारवा थोडा त्रासदायक वाटल्यानं मी खिडकी अर्धवट बंद केली...रात्रीच्या मध्यान्ह काळोखात  पाऊस चांगलाच रमला होता...अन रात्रही भिजकी होत त्याला साद घालत होती...
          बागेतल्या नुकत्याच उमलणा-या कळीवर एखाद्या फुलपाखरानं अलगद येउन बसल्याची जाणीव व्हावी तसाच एक विचार मनात आला- कुणाशीतरी मनसोक्त बोलावं या पावसाबद्दल ! पण दुस-याच क्षणाला जाणीव झाली या मध्यान्ह रात्री नेमके कुणाशी बोलणार आपण ?  कॉल करावं म्हटलं तरी हि वेळ योग्य नव्हती.अन खरं म्हणजे प्रश्न वेळेचा नव्हताच..प्रश्न होता बोलण्याचा...! हल्ली या जगात मनसोक्त असं बोलतच नाही कुणी ! कधीच नाही..मग ती वेळ मध्यान्ह रात्र असो कि गजबजलेल्या वाटेनं सरकत सरकत मावळणारा दिवसही ! खूपच ब्युझी झालोत आम्ही काहीतरी कमावण्यात...पैसा, स्टेटस..आणि  बरंच काही न सांगण्यासारखं. मला इतकंच आठवलं - रात्री एस.टी.त बसल्यावर गाणं गुणगुणत नगर शहर सोडलं होतं...पण आता याच वाटेवर पाऊस भेटल्यानं मोह होत होता कुणाशीतरी बोलण्याचा. क्षणभर एक अजब गोष्ट मनात आली कि, स्वतःच स्वतःला  कॉल करावा अन केलाही पण व्यस्त असल्याचं सांगितलं..खरंच यार..किती अजब गोष्ट आहे ना ! आपण कुणाचाही नंबर डायल करू शकतो हवं तर पण स्वतःचा नंबर नेहमीच व्यस्त असतो स्वतःसाठी..म्हणजे जगात कुणाशीही आपण बोलू शकतो पण स्वतःशी कधी बोलायचं म्हटलं तर...? किती मार्मिक वाटतोय हा क्षण मला ! मी ठरवलं आता स्वतःशीच बोलायचं फक्त....
       अर्धवट झोपेत असताना कुणीतरी शेजारी येउन निजावं तशी एक - एक आठवण येऊ लागली मनात...मग आठवत गेलं त्या झिम्माड पावसात भिजत-भिजत वाहिलेलं अल्लड बालपण...चिखल होऊन पायाशी दरवळलेल्या मातीचा सुवास..थोड्याश्याच पावसानं भिजकी होणारी पण तितकीच घट्ट असलेली मातीची घरं..घरांचं अंगण..अंगणातली वाळू ...पाखरांची घरटी..तुटलेली..तुटणारी...पुन्हा फांदीवर डोलताना दिसणारी..मध्येच कधीतरी शहाणपण शिकवणारी शाळा ..मास्तर...शाळेतले दोस्त...खेळण्यापेक्षा भांडणंच जास्त  पण मनातून अखंड प्रेम करायला शिकवणारे ते दिवस..आठवत गेला तो ग्रीष्म..आषाढ..अन श्रावणही -  साज-या केलेल्या उत्सवांसोबत ! एखाद्या सुवासिनीने वारुळाला पुजावं तसं 'शिकून मोठा साहेब हो' म्हणत तोंडावरून मायेचा हात फिरवणारी म्हातारी माणसं अन खरोखर मोठं होण्याच्या खुळचट ओढीनं  झपझप चालत शाळा - कॉलेज-नोकरीपर्यंत पोचलेलो आपण ! ....आठवत राहिलं पहिलं लेक्चर...पहिली कविता..पहिलं प्रेम..पहिलं ऑफिस ...ऑफिसातली खिडकी अन खिडकीबाहेर कोसळत असलेला धो -धो पाऊस ! तसाच बोलत राहिलो आठवणींसोबत.....भिजण्याची ओढ असतानाही भिजू शकत नव्हतो..अन बोलण्याची इच्छा असतानाही गप्प राहिलेला मी...!
         खरं म्हणजे या आठवणींच्या रुपानं बोलतच राहिलं आयुष्य तेव्हा...! अन  आपल्याच आयुष्यानं आपल्याशी बोलावं असा अफलातून क्षण मिळणार तरी केव्हा..? फारच दुर्मिळ ! कारण आम्ही गुंतत चाललोय - टी.व्ही., इंटरनेट अन फेसबुकच्या जाळ्यात. होय आम्ही तासंतास चाटिंग करतो समोर कोण आहे हे  माहित नसलेल्या, कदाचित फेक असलेल्या अकौंटशी! पण आम्ही कधीच बोलत नाही स्वतःशी. तासंतास ...दिवसेंदिवस..अन वर्षानुवर्षे..मची आमच्याशीच नसते होत गाठ-भेट...म्हणूनच आम्ही नाही गाऊ शकत स्वच्छंदी पाखरांसारखं..नाही बागडू  शकत मोरांसारखं आभाळ भरून आल्यावरही...शरीराला खूप सुखं दिलीत पण मनाला आम्ही कधीच विचारलं नाही- तुला काय हवंय म्हणून ? कधी कधी वाटतं दुसर्याशी बोलण्यासाठी नेटवर्क  शोधत खूप दूर गेलो आपण..पण स्वतः पर्यंत पोहोचायचं राहूनच गेलं....!
        पहाटेच्या धुसर - तांबड्या प्रकाशात दोन पाखरं उडताना दिसली...माझी हिरकणी..आता हिरव्यागर्द कोल्हापूर शहरात येउन थबकली होती...भोवताली रस्त्यावरची गर्दी पाहून क्षणभर  वाटलं..आपल्या आतही  अश्या अनेक चेहऱ्यांची गर्दी असते ना! फरक इतकाच कि आपण त्यांना ओळखत नसतो..कारण ते चेहरे असतात आपल्या...चंचल...बाव-या..अबोल कधी बोलक्या मनाचे ..!
                                                                                                                 -  कृष्णा बेलगांवकर 

"आठवणीतला भिजपाऊस....."

                                                                                            Dainik Lokmat, Ahmednagar, August 2014
      

      सहज डायरीचं पान उलटलं - निरव शांततेत अचानक कसलातरी आवाज व्हावा अन भयभीत पाखरांनी मिळेल त्या दिशेला झेप घेऊन पळावं, तसे अनेक क्षण डोळ्यांसमोर तरळले ...थोडे गतकाळातले -घडून गेलेले ; थोडे आजही घडत राहिलेले...! ती ग्रीष्मातली सकाळ...चिंब भिजलेलं शहर...रस्त्यावरची गर्दी...रिक्षाचे हॉर्न...चौकातले पोलिस...रस्त्यालगतची चहाची दुकानं...त्याच भिजक्या वाटेवर अलगद पावलं टाकत कॉलेजला येणारी पोरी - पोरं...अन एखाद्या सौंदर्यवतीनं लाजून बसावं, तसंच  हिरव्यागर्द झाडीत दडून बसलेलं 'न्यू आर्ट्स कोलेज'...!

      पत्रकारितेच्या निमित्तानं शहरात आलो अन कॉलेजशी  नातं जोडलं गेलं. मनात नसतानाही एम.एस्सी.ला प्रवेश घेतला अन प्रवासाची वाटच बदलली. ऑफिसमधल्या सहका-यांऐवजी भोवताली मित्र-मैत्रीणींचं वर्तुळ वाढत गेलं. मग एखाद्या तरुण कवीनं शीळ वाजवत बागेत फिरावं तसंच कॉलेजला यायचो मी. नवी - कोरी हर्कुलीस होतीच सोबत. एखाद्या वादळानंतर सूर्यानं पूर्वेकडून उगनंच सोडून द्यावं, तसा कधीही-कुठूनही यायचो मी कॉलेजात! ' सारे रस्ते आपल्याच बापाचे ' असं तेव्हा मनात नव्हतं, तेव्हढंच आता बरं वाटतं. सकाळीच विशाल गणपतीला  जायचं, अन कॉलेज सुटल्यावर नाटकाच्या रिहर्सलला ...कधी कधी आकाशवाणीलाही बडबड करायची, याशिवाय शहरातली सांस्कृतिक चळवळ , गणेशोत्सव , नवरात्र आणि  उरल्या वेळेत 'कॉलेज कट्टा !' खरं म्हणजे 'राजकारण' सोडलं तर सारंच भावलं या शहरातलं...अन सगळ्यांत जास्त भावला तो धो - धो कोसळणारा भीजपाऊस !
MR. Krishna
      कधी कधी दिवसभर आभाळ झाकोळून यायचं अन कुढत बसलेल्या तानुल्या पोरानं एकाएकी खुदकन हसावं तसा अचानक तो सुरु व्हायचा ...कॉलेज समोरचं भलं-थोरलं गुलमोहोराचं झाड मनसोक्त अन रुबाबात न्हाताना दिसायचं. मग पुन्हा निघायचो मी रेंजर सायकल घेऊन त्या पावसात फेरफटका मारायला..चितळे रोड , कापड बाजार, नगर कॉलेज,चांदणे चौक , डी.एस. पी. ते पत्रकार चौक. छे! पोलिसमामासुद्धा नाद करायचे नाहीत-सायकल कशाला अडवतील ते? मग जायचं वस्तीगृहात, अंघोळ करून कपडे बदलायचे, तितक्यात मैत्रिणीचा फोन - 'गरम-गरम भजे खायला जायचं'. याची आपली रिमझिम चालूच..कॉलेज समोरची रंगी-बेरंगी पोरांनी  गजबजलेली  कॅन्टीन ..भज्यांचा खमंग सुवास...दोघांत एक प्लेट मुद्दामहुन मागवायची..! अरे आजही नाद नाही त्या भज्यांचा...चहाचा तर मोहच सुटत नाही. मग पुन्हा धो-धो पाऊस...माझ्या काळजीनं तिनं आणलेली एकुलती एक छत्री. पण मला छत्री नाही, पाऊस आवडतो..छत्री बंद..पाऊस चालू..दोघेही ओलेचिंब ....सोबत भिजलेलं शहर...भिजलेले रस्ते...झाडाखाली पाऊस चोरून थांबलेली आम्हाला पाहणारी गर्दी...अन जणू फक्त आमच्यासाठीच कोसळत राहणारा आमचा जिवलग... भिजपाऊस !
    क्षणात डायरी बंद केली- गतकाळातला भिजपाऊस डोळ्यांतून पाझरला आज. तेव्हाचे भिजलेले रस्ते...भिजलेलं शहर...अन भिजलेले कपडे..सारं सुकून गेलं असेल पण त्या आठवणी? - आजही भिजक्याच आहेत त्या ! मनाच्या खोल जलाशयात तरंगणाऱ्या त्या आठवणींचं कधी गोठून शिंपलं तरी का होऊ नये?
     कॉलेज सोडलं, त्यानंतर शहरच सोडलं...तो 'जिवलग' पुन्हा भेटलाच नाही कधी.....!

                                                                                                                 -  कृष्णा बेलगांवकर 

तिमिरातून..तेजाकडे........!

    मनाची भाषा मनापर्यंत कळावी म्हणून शब्दांची निर्मिती झाली..या शब्दांना गोड अर्थ असावेत म्हणून विचारांची निर्मिती झाली अन विचारांना जगण्याची परंपरा असावी म्हणून संस्कृती निर्माण झाली...अर्थात हि संस्कृती'च माणसाच्या जीवनातला एक महोत्सव आहे आणि दिवाळसण म्हणजे या महोत्सवाचा एक अविभाज्य भाग...सध्या सर्वत्र साजरा होत असलेल्या या महोत्सवाबद्दल ...हिंदू संस्कृती आणि विचारांचा मागोवा घेणारा हे लेख...!

     

    'असतो मा सद्गमय..तमसो मा ज्योतिर्गमय..मृत्योर्मा मृतंगमय...' अगदी अर्थही माहित नव्हता तेव्हापासून सहज ही प्रार्थना म्हणत आपण मोठे झालो..आणि आता वाटतं त्या अर्थापेक्षा भावनाच महत्वाच्या होत्या..दिवाळीनिमित्त  परमेश्वराकडून काय मागावं तर हेच - असत्याकडून सत्याकडे..तिमिरातून तेजाकडे....मृत्युकडून अमरत्वाकडे प्रवास होवो आमचा...आणि  आमच्यासोबत या बलशाली उज्ज्वल संस्कृतीचाही !
    ..आता गोड-गोड पदार्थांचा सुवास घरात दरवळून गेला असेल..अंगणातली रांगोळीच काय पण गायीच्या गोठयातही पणतीचा प्रकाश जाऊन पोहोचलाय अन धरतीनं उजेडाचंच घेतलं अभ्यंगस्नान  जणू रुपडं बदलून लक्ष्मी वाट पाहतेय तशी दिव्यांच्या भरजरी पोशाखात लखलखून गेलीय ती..
    आज मुद्दामहून  मध्यान्ह रात्री उठलोय दिपावलीच्या निमित्तानं जगाचं हे लखलखतं रूप पाहण्यासाठी ! कुठल्याही प्रयत्नांत घराच्या छतावर जाऊन पाहावं म्हटलं तरी शक्य होईना पण, जे पाहिलं ते चिरंतन डोळ्यांत साठून ठेवावंसं  वाटलं. जगच ते पण पूर्ण प्रकाशानं  न्हाऊन निघालेलं....! क्षणभर वाटलं खरच इतकं प्रकाशमान झालं असेल का हे जग? मनात प्रश्न आला कशासाठी साजरी करतो आपण दिवाळी-केवळ अंधाराला नाहीसं करण्यासाठी? मग ती दररोजच का नाही करत? मी नजर वळवून जर वेगळ्या दिशेला पाहिलं - काळोख मिस्किलपणे हसत होता. मग समजलं परमेश्वरानं एकाचवेळी दोन गोष्टी निर्माण केल्या - उजेड आणि अंधारही ! त्याला संपूर्ण जग सुंदर नव्हतं बनवायचं...तसं पूर्ण कुरुपही होऊ  द्यायचं नव्हतं. त्यानं निर्र्विकारपणे साकारलेलं हे जग त्याला आकारून घ्यायचंय माणसाच्या हातून...त्यासाठीच हा अंधार आणि उजेडाचा खेळ..!
   माणसाच्या संस्कृतीला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा प्रवास आणि खरं म्हणजे मनातल्या विचारांना  प्रकाशमान करणारा हा महोत्सव ! दिपोत्सव म्हणजे दिव्यांचा सण अन या दिव्यांचं माणसाच्या विचारांशी मोलाचं नातं आहे असं मला वाटतं. मी सहज पाहिलं-मध्यान्ह रात्रीला चकाकणारं, प्रकाशात न्हाऊन गेलेलं जग..आकाशातलं चांदणं धर्तीवर सांडावं तसंच अभिनव सौंदर्यानं खुलून आलेलं वसुंधरेचं रूप..फटाक्यांचे मधूनच उमटणारे कर्णभेदक सूर ..स्वप्नातल्या आभासी दुनियेसारखं पण सत्यच होतं ते सारं उजेडानं व्यापून गेलेलं. तरीही एक अस्वस्थ प्रश्न राहून राहून  व्याकुळ करीत  होता - मनातल्या अंधाराचं काय? हा महोत्सव सर्वत्र साजरा होतोय पण मनाच्या खोल दरीत वर्षानुवर्षे  गडध  होत चाललेल्या  अविचारांचं  काय होणार ? तेथे कधी पोहोचणार या  महोत्सवाचा उजेड ?  खरं तर हा उत्सव मनातच आधी साजरा व्हायला हवा..बाहेर प्रचंड असुद्या  रेलचेल या आनंदाची पण मनाच्या आतही कुठेतरी करून-दीन चेहऱ्यांची गर्दी जमलीय...ज्यांनी कधीच दुरावे मांडलेत सर्वांशी..ही मनातली घालमेल..हा अंधारच नाही तर काय ? हा अंधार नाहीसा होत नाही तोपर्यंत तरी हा सण साजरा केल्याचं समाधान वाटणार नाही असं मला वाटतं, कारण आम्ही उंचच उंच जाऊन पोहोचलो पण तितकेच खोलवरही रुतलोय हे लक्षातच नाही आमच्या..केवळ अंगणातल्या एका पणतीने काय होणार मग ? तशीच एक विचारांची पणती सतत मनात तेवत ठेवण्याची वेळ आली आहे. या मातीतलं हे इवलसं जग , या जगातली माणसं, माणसांची संस्कृती सारं विचारांवर आधारलेलं आहे. मला वाटतं विचारांचं चांगलेपण हे दीपोत्सवाचं  अर्थात उजेडाचं रोपटं आहे.
खुप काही मिळविण्याच्या प्रयत्नांत आपण खूप काही गमावून बसलो आहोत हे समजलच नाही कधी..माणसांपेक्षाही तंत्र विकसित झाली आणि त्यापेक्षा माध्यमं ..माध्यमांमुळे माणसाच्या  विचार - अविचारांचं मिश्रण झालं-मी म्हणेन वैचारिक प्रदूषणच!. हाच आमच्या जगण्यातला अंधार . विचार हरवलेत-संस्कृती धास्तावली- माणसं दुरावली - आता मला भीती वाटते हे इवलसं जग (?) नाहीसं होण्याची..!
    या दिपावलीच्या निमित्ताने नवनिर्मितीच्या क्षणांना माझं हेच मागणं आहे.. आता हा उजेड आभाळभर ओसंडून वाहू दे...असाच कोसळू दे हा उजेडाचा पाऊस...अन दिव्यांचं स्वतः होऊन जळत रहाणं प्रेरणा होऊन आमच्या आयुष्यात येऊ दे... नकळत  या सणाच्या सीमेवर विरघळत जावो  अंतःकरणातले धुसर तसे गडदही, पण साचलेले दांभिक विचार...अन उजडो एक नवं प्रज्वलित कोमल किरणांचं साम्राज्य...नवा प्रहर अर्थात तेव्हाच साजरा होईल खरा  'दिपोत्सव......!'
                                                                                                                -  कृष्णा बेलगांवकर 

मावळलेला पाऊस.....!


"माणसाच्या आयुष्यात सुखांची किंमत किती आहे हे मी नक्की नाही सांगू शकत. पण हि सारी सुखे आयुष्यात आणणाऱ्या माणसांची किंमत ' अतुल्य' आहे हे मी प्रकर्षाने जाणतो !."


      न्यू आर्ट्स महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र  विभागाचा माजी विद्यार्थी मेळावा  नुकताच पार पडला. या विभागाची स्थापना झाल्यानंतर म्हणजे सुमारे १९८९ पासून तर २०१२ पर्यंतचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात विभागाने निमंत्रित केले होते. आणि या सर्व माजी विद्यार्थ्यांविषयी प्रेम असणारे सर्व प्राध्यापक हे या कार्यक्रमाचे आयोजक होते.  

Author
                                     
       कॉलेजलाईफ  संपल्यानंतर एकमेकांना भेटण्यासाठी उस्तुक असलेल्या अनेक मित्रांना  आणि मैत्रिणींना हा कार्यक्रम म्हणजे एक अनोखी पर्वणी होती. निमंत्रण पत्रिकेत नमूद केलेल्या वेळेप्रमाणे २४ मार्च या दिवशी या उस्तुकलेल्या सर्वांची पाऊलवाट त्यांना कॉलेजच्या दिशेने  घेऊन येऊ लागली..आता मनात एक हूर-हूर होती...कोण-कोण भेटेल अन...कोण भेटणार नाही ..? याची...ठरल्या वेळेत बरेच जण जमले...पण तरीही कोणीतरी येण्याचे बाकी असल्यासारखे वाटत होतेच..वाट बघता -  बघता कार्यक्रम सुरु झाला..अगदी सगळेचजण बर्याच दिवसांनी भेटले असल्याने..एकमेकांशी  भावना शेअर करण्यासाठी आसुसले होते...अखेर त्या प्रगल्भ व्यासपीठावर त्या सगळ्याच भावनांचा पाऊस ओसंडून पडला..कोणी गुरूंसाठी , कोणी मित्रांसाठी , कोणी मैत्रिणींसाठी तर कोणी...आयुष्य घडविणाऱ्या पुस्तकांसाठी भाऊक होऊन बोलत होते...परंतु दिलेल्या वेळेत सगळ्याच भावना सहज व्यक्त होतीलच असे नाही..तेव्हा काही अव्यक्त ..न बोलू शकणाऱ्या भावनाही...मना-मनांतून रेंगाळत होत्या....त्या बर्याच दिवसांनतर पडलेल्या पावसाविषयी...काही मोकळ्या भावनांचा हा अविष्कार....!

"कॉलेज लाईफ म्हटलं कि आयुष्यातील उमलत्या भावनांचा धगधगता कोपरा' असं मला नेहमी वाटतं. कारण नुकत्याच उमलायला लागलेल्या या वयात अनेक गोष्टी आपला नकळत पाठलाग करीत असतात..आणि विशेष म्हणजे  त्यातीलच अनेक गोष्टींसाठी आपणही नकळत हळवे होत जातो...!
    मी अहमदनगर शहरात दै.सार्वमतमध्ये उपसंपादक म्हणून काम करत असताना प्रा.कडलग सर यांची भेट झाली. मला बी.एस्सी. ला चांगले मार्क्स होते त्यामुळे त्यांनी अर्थातच एम.एस्सी.ला प्रवेश घ्यायला सुचवले.. माझ्या अनेक अडचणी होत्या. जॉब सोडला तर आर्थिक अडचण येणार होती हेही मी सरांना सांगितले. पण सरांनी सहकार्याची भावना दाखवली, त्यामुळे काहीच दिवसांनी मी जॉब सोडून दिला आणि  केवळ १४०० रुपये  भरून अडमिशन घेतले. उर्वरित फी भरण्यासाठी  पुन्हा दैनिक एकमत मध्ये जॉईन झालो...
  त्यानंतर आयुष्यातल्या एका वेगळ्याच संघर्ष्याला सुरुवात झाली..अन मी दोन बाजूंनी पहाड असणार्या फटीत अडकलो. एकीकडे ऑफिस आणि दुसरीकडे एम.एस्सी.चे प्रात्यक्षिक असायचे.  त्या दिवसांचं शेडूल इतकं प्याक होतं कि, पाहिलं सेमिस्टर जवळ आलं तेही कळलं नाही. पण त्या काळात मला माझ्या ऑफिसने , सर्व शिक्षकांनी  आणि माझा मित्र सुमित आणि मैत्रिणींनीही खूप मदत केली. त्यानंतर दुसर्या सेमिस्टरला मी जॉब बंद केला आणि अभ्यास करू लागलो. खरं तर मी त्या वेळी अभ्यास फारसा करत नसायचो. पण मला ग्रुप फार चांगला मिळाला होता. माझ्या वर्गात सुमित , प्रवीण आणि मी (कृष्णा) असे तिघेच मुले होतो. आणि बाकी सगळ्या मुली होत्या. त्यात पिंकू,मोनू,शीतल,कांचन,दक्षायानी,रोहिणी,पुनम,राणी,सुवर्णा आणि..स्मिता असा ग्रुप होता. या ग्रुप मध्ये प्रवीण आणि सुमीत फार काळ सुट्टीवर जायचे..मग मी एकटाच असायचो. तेव्हा माझ्या मैत्रीनिनीही मला कधी दूरचं असल्यासारखं भासू दिलं नाही.
   आमचा ग्रुप एक वेगळीच ओळख मिळून गेला..प्रत्येक सेमिस्टरच्या वेळी डिपार्टमेंटने आयोजित केलेल्या ट्रिपलाही आमचा भर-भरून प्रतिसाद असायचा. आमचे सर प्रा. डॉ. बी.ए.पाटील सर, कडलग सर, एम.टी.पाटील सर, डॉ .साळवे सर , डॉ.ठुबे सर,धामणे सर, डॉ.काळे सर, धुमाळ म्याडम ,कदम म्याडम, मुळे म्याडम, कारले म्याडम, या सर्वांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. आमची टीम यशस्वी होऊ शकली. ती या सगळ्या गोष्टींच्या अनुकूलतेमुलेच ! अखेर या सगळ्या गुरुवर्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही २०११ च्या अखेरीस वनस्पतीशास्त्र  विभागाचा निरोप घेतला... आज अनेक दिवसांनी त्या आठवणींनी मनात डोकावण्याचा प्रयत्न केला..मन त्या आठवणींनी तुडुंब भरून आलं...मृगाचा पाऊस पडून गेल्यानंतर ओल्या मातीचा सुगंध दरवळत राहावा...तसेच ते क्षण आजही मनात सुगंधी होऊन दरवळत आहेत.. त्यातले पुन्हा कोणीही भेटले नाहीत...काहीजण आलेत ते फारच बदलून...त्यावेळी जी निरागसता होती ती आता जणू कुणालातरी बहाल करून ते आले असावेत असे वाटत होते... या आठवणी रेखाटत असताना मानवी मनाचं एक  अतीव दु :ख मनाला स्पर्शून गेलं ते म्हणजे, आपलीच जवळची माणसे वेश बदलून भेटायला येतात आणि इतकी नाचक्की कि ते आपल्याला ओळखत देखील नाही...! माझा महेश नावाचा मित्र मला व.पु. काळे यांचं एक वाक्य नेहमी सांगायचा- you never meets same man again ! याचा अर्थ फारच सुंदर अन व्यापक आहे..तो वर नमूद केलेल्या घटनेचा संदर्भ स्पष्ट करून जातो ...म्हणून मलाही वाटतं कि माणसांनी माणसांना भेटणं फारसं दुर्मिळ झालेलं नाही..पण मुखवटे एकमेक्कांना मिठी मारतात तेव्हा हृदयात असलेली माणसे हरवलेली नसावीत! असं असेल तर खरच सर्वांना भेटण्यात आनंद आहे..माझ्या ग्रुप मधले आम्ही चौघे-पाच जण सोडले तर बाकी कोणीही आले नाहीत..कारण त्यांना काम होतं. इतकंच! पण जे आले त्यांना ..एकमेक्कांना भेटण्याची उस्तुकता होती. माझा एक होस्टेलचा मित्र तर हे जगच सोडून गेल्याचं इथे आल्यानंतर कळलं...फार वाईट वाटलं...माणसे मरतात याचे फार वाईट नाही वाटत मला...वाईट याचं वाटतं कि त्यांना मरण्यापूर्वी शेवटचं भेटताही येत नाही..! म्हणूनच मी सुरुवातीलाच बोललोय कि, - "माणसाच्या आयुष्यात सुखांची किंमत किती आहे हे मी नक्की नाही सांगू शकत. पण हि सारी सुखे आयुष्यात आणणाऱ्या माणसांची किंमत ' अतुल्य' आहे हे मी प्रकर्षाने जाणतो. !"
      आज कॉलेज लाईफ संपून कितीतरी दिवस उलटून गेले..पण मी त्या आठवणींवर जगतो आहे..सगळ्याच आठवणी गोड आहेत असे नाही पण ज्या चांगल्या आहेत..त्या सर्वच आठवणी मनाला..अन नकळत आपल्या आयुष्यालाही एक नवा रंग देतात असा माझा विश्वास आहे..मी फुललो...बहारलोय त्या दिवसांमध्ये मी त्या दिवसांना कधीच विसरू शकणार नाही. आणि आताची प्रत्येक घडी त्या दिवसांशी तुलना केली तर बेचव वाटायला लागते...मग मनाला प्रश्न पडतो...का आपणही थोडे बदलत चाललोय ? मान्य आहे कि भोवतालची परिस्थिती आज आपल्याला बदलविण्यास कारणीभूत ठरत आहे..पण या परिस्थितीच्या अमानुष पिल्लांचे ओझे घेत-घेत आपण असेच गुदमरून जायचे का?...प्रश्न अनेक आहेत..पण त्याला एक उत्तरही आहे..ते म्हणजे आपलं निरागस जगणं. कधी कधी तर वाटतं कॉलेज लाईफ संपल्यापासून आपण फक्त जगण्याचा  अभिनय करत आहोत...अन जीवन जगता-जगता जगणंच हरवून गेलोत आपण..खरंच आजही वेड्या करतात या कॉलेज लाईफमधल्या आठवणी...बिचार्या..मी बेघर झालो तरीही...त्या मनात घर करून आहेत.....!
     

                                                                                                                 
                                                                                                         - कृष्णा बेलगांवकर 
                                                                                                           krishnainfo14@gmail.com




न्यू आर्ट्स महाविद्यालयातील माझा एम.एस्सी..(२०११)

पिंकू,  स्मिता,  अश्विनी,  आम्रपाली,  कांचन,  मोहिनी,  शितल,  दाक्षायानी,  कृष्णा,  सुमित,  प्रवीण  आणि प्रा. सुभाष कडलग.


चाहूल....

                                                                                                         Dainik Ganvkari, Nasik May 2010.

     फार अस्वस्थ  वाटतंय, ढगाळलेल्या वातावरणात वादळ सुटलं कि असंच वाटतं. खरं तर याच वातावरणात लहानपणी खूप मौज वाटायची, आज मात्र हूर हूर वाटते. घडून गेलेल्या अन अर्धवट घडलेल्या  घटना, भेटलेली माणसं, जिवलग दोस्त आणि चाहते सुद्धा... डोळ्यांसमोरून तरळून जातात. आई-बाबा अन भावंडही दिसतात. लहानपणातल्या  माझ्या खोडकरपणाला काठीचा धाक दाखवणारी आजीही दिसून जाते.. अंगाई गाणा-या आईचा कंठ दाटून आल्यासारखा वाटतो.., तर लपंडाव खेळताना अंगणात धावणारे आम्ही पोरंही नकळत दिसून जातो...तेव्हा खेळता खेळता दिवसभराचा एक तास झाल्यासारखा वाटायचा, आता एकच तास दिवस भराहून मोठा वाटतो. सर्वांच्या आठवणीने व्याकुळ करून सोडणारी ही वेळ संपत का नाही लवकर ? म्हणून मी उगाच एका टेकडीवर मावळत्या सूर्याच्या उन्हाचा आस्वाद घेत बसलोय.. 
      आज तब्बल आठ वर्षांनंतरचा मायभूमीतला  सूर्यास्त मी पाहतोय. नेमके सायंकाळ म्हणावं की कातरवेळ ? या विचारांतच मी अस्वस्थ आहे. ते अल्लडपणाचे दिवस कधीच संपलेत. अर्ध्या तपात महाराष्ट्रातली बहुतांशी ठिकाणं फिरून झाली..पण; इतक्या दिवसांत असा सूर्यास्त एकही पाहायला मिळाला नाही. जे पाहिलं ते मोहात पाडणारं अन कित्तेकदा तर सोडूच नये असं वाटणारं होतं. खरच काहीसा वादळी वाटणारा आजचा हा सूर्यास्त वंदनीय आहे...चला पाहता पाहता  आठवणींचा एक पट डोळ्यांसमोरून तरळून गेला. भोवतालच्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला. ढग भरून आलंय...ज्या सुर्यास्ताबद्दल मी बोलत होतो..तो कधीच ढगाआड गेला; पण मावळला नसेल अजून. गावाच्या उत्तरेला गोदावरी नदी आहे, त्या बाजूने वादळाने जोर धरला. गवताचे ओझे चा-याच्या पेंढ्या डोक्यावर घेऊन घराकडे परतणारे वादळाशी झुंज देऊ लागले. अचानक पाऊस येतो की काय? या भीतीने काहींची आवरा-आवर सुरु झाली. मोठ्यांना वादळात होणा-या नुकसानीची धास्ती तर लहानग्यांना ऊन जाऊन सावलीत खेळायला मिळाल्याचा आनंद... गावाच्या पूर्वेकडून गायी-म्हशींचा मोठा कळप गावाकडे परतताना दिसतो. त्यातच काही शेळ्यांचं ओरडणं सायंकाळच्या अस्वस्थतेत भर घालीत मनाला डिवचून जातं. दूरवर  कोठेतरी एक आई आपल्या लाडक्याला हाक मारते, इतक्यात नळाला पाणी आलंय. चार-दोन म्हाता-यांसोबत पोरांची नळावर जमलेली गर्दी-अशांततेत आणखी भर! गावाच्या मध्यभागी एका पडक्या इमारतीजवळ दोन पोरं चोरून सिगारेटचा झुरका मारतात. समोरच्या उंच, थोरल्या पिंपळाच्या झाडावर एक घरटं आनंदानं डोलतंय..'आता कोसळायचंच  तर दुख मानून काय घेणार?, तेव्हा आनंदातच कोसळू या.' असंच कदाचित ते म्हणत असेल.पण पक्षी मात्र बेफिकीर, बिनधास्त. पक्षीच काय त्यांची घरटीही आता शौर्य दाखवायला लागली..म्हणून वाटतं - 'पक्षी उडतात ते बुलंद झेप घेऊनच..मागे कधी परतायचं याचा ते विचार करीत नाहीत, कारण त्यांचा विश्वास असतो आपल्या पंखांवर आणि त्यांच्यात असते जिद्द..प्रत्येक फांदीवर, प्रत्येक झाडावर..नवं घरटं उभारण्याची!' खरंच किती श्रीमंत आहे हा निसर्ग! आपलं उदात्त वैभव उधळून देतानाच त्याची निर्मितीही त्याने त्यातूनच साधलेली असते..अन पाखरं तरी कशी, आपला सोबती म्हणून निसर्गाला सारं काही माफ करीत ते पुन्हा मैलोनमैल भटकत असतात... छे! क्षितिजात विहार करतानाच त्यांचं मन क्षितीजाहून मोठं झालेलं असतं.
     दोस्तांनो..,वादळ आनं अन गेलंही.... या वादळात मातीचा कण अन कण सामील झाला. त्याला पाहून 'हेच वादळ आगामी मान्सूनची चाहूल तर नसेल ना!'  असं वाटल्यानं  बळीराजा थोडा गहिवरला, थोडा सुखावलाही असेल;..पाहता पाहता आकाशाच्या कडा काळोखात विरघळल्या..सायंकाळ की कातरवेळ हे समजण्याआधीच ती वेळ पश्चिम क्षितिजावर निद्रिस्त झाली....!
                                                                                                                      -  कृष्णा बेलगांवकर