मनाची भाषा मनापर्यंत कळावी म्हणून शब्दांची निर्मिती झाली..या शब्दांना गोड अर्थ असावेत म्हणून विचारांची निर्मिती झाली अन विचारांना जगण्याची परंपरा असावी म्हणून संस्कृती निर्माण झाली...अर्थात हि संस्कृती'च माणसाच्या जीवनातला एक महोत्सव आहे आणि दिवाळसण म्हणजे या महोत्सवाचा एक अविभाज्य भाग...सध्या सर्वत्र साजरा होत असलेल्या या महोत्सवाबद्दल ...हिंदू संस्कृती आणि विचारांचा मागोवा घेणारा हे लेख...!
'असतो मा सद्गमय..तमसो मा ज्योतिर्गमय..मृत्योर्मा मृतंगमय...' अगदी अर्थही माहित नव्हता तेव्हापासून सहज ही प्रार्थना म्हणत आपण मोठे झालो..आणि आता वाटतं त्या अर्थापेक्षा भावनाच महत्वाच्या होत्या..दिवाळीनिमित्त परमेश्वराकडून काय मागावं तर हेच - असत्याकडून सत्याकडे..तिमिरातून तेजाकडे....मृत्युकडून अमरत्वाकडे प्रवास होवो आमचा...आणि आमच्यासोबत या बलशाली उज्ज्वल संस्कृतीचाही !
..आता गोड-गोड पदार्थांचा सुवास घरात दरवळून गेला असेल..अंगणातली रांगोळीच काय पण गायीच्या गोठयातही पणतीचा प्रकाश जाऊन पोहोचलाय अन धरतीनं उजेडाचंच घेतलं अभ्यंगस्नान जणू रुपडं बदलून लक्ष्मी वाट पाहतेय तशी दिव्यांच्या भरजरी पोशाखात लखलखून गेलीय ती..
आज मुद्दामहून मध्यान्ह रात्री उठलोय दिपावलीच्या निमित्तानं जगाचं हे लखलखतं रूप पाहण्यासाठी ! कुठल्याही प्रयत्नांत घराच्या छतावर जाऊन पाहावं म्हटलं तरी शक्य होईना पण, जे पाहिलं ते चिरंतन डोळ्यांत साठून ठेवावंसं वाटलं. जगच ते पण पूर्ण प्रकाशानं न्हाऊन निघालेलं....! क्षणभर वाटलं खरच इतकं प्रकाशमान झालं असेल का हे जग? मनात प्रश्न आला कशासाठी साजरी करतो आपण दिवाळी-केवळ अंधाराला नाहीसं करण्यासाठी? मग ती दररोजच का नाही करत? मी नजर वळवून जर वेगळ्या दिशेला पाहिलं - काळोख मिस्किलपणे हसत होता. मग समजलं परमेश्वरानं एकाचवेळी दोन गोष्टी निर्माण केल्या - उजेड आणि अंधारही ! त्याला संपूर्ण जग सुंदर नव्हतं बनवायचं...तसं पूर्ण कुरुपही होऊ द्यायचं नव्हतं. त्यानं निर्र्विकारपणे साकारलेलं हे जग त्याला आकारून घ्यायचंय माणसाच्या हातून...त्यासाठीच हा अंधार आणि उजेडाचा खेळ..!
माणसाच्या संस्कृतीला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा प्रवास आणि खरं म्हणजे मनातल्या विचारांना प्रकाशमान करणारा हा महोत्सव ! दिपोत्सव म्हणजे दिव्यांचा सण अन या दिव्यांचं माणसाच्या विचारांशी मोलाचं नातं आहे असं मला वाटतं. मी सहज पाहिलं-मध्यान्ह रात्रीला चकाकणारं, प्रकाशात न्हाऊन गेलेलं जग..आकाशातलं चांदणं धर्तीवर सांडावं तसंच अभिनव सौंदर्यानं खुलून आलेलं वसुंधरेचं रूप..फटाक्यांचे मधूनच उमटणारे कर्णभेदक सूर ..स्वप्नातल्या आभासी दुनियेसारखं पण सत्यच होतं ते सारं उजेडानं व्यापून गेलेलं. तरीही एक अस्वस्थ प्रश्न राहून राहून व्याकुळ करीत होता - मनातल्या अंधाराचं काय? हा महोत्सव सर्वत्र साजरा होतोय पण मनाच्या खोल दरीत वर्षानुवर्षे गडध होत चाललेल्या अविचारांचं काय होणार ? तेथे कधी पोहोचणार या महोत्सवाचा उजेड ? खरं तर हा उत्सव मनातच आधी साजरा व्हायला हवा..बाहेर प्रचंड असुद्या रेलचेल या आनंदाची पण मनाच्या आतही कुठेतरी करून-दीन चेहऱ्यांची गर्दी जमलीय...ज्यांनी कधीच दुरावे मांडलेत सर्वांशी..ही मनातली घालमेल..हा अंधारच नाही तर काय ? हा अंधार नाहीसा होत नाही तोपर्यंत तरी हा सण साजरा केल्याचं समाधान वाटणार नाही असं मला वाटतं, कारण आम्ही उंचच उंच जाऊन पोहोचलो पण तितकेच खोलवरही रुतलोय हे लक्षातच नाही आमच्या..केवळ अंगणातल्या एका पणतीने काय होणार मग ? तशीच एक विचारांची पणती सतत मनात तेवत ठेवण्याची वेळ आली आहे. या मातीतलं हे इवलसं जग , या जगातली माणसं, माणसांची संस्कृती सारं विचारांवर आधारलेलं आहे. मला वाटतं विचारांचं चांगलेपण हे दीपोत्सवाचं अर्थात उजेडाचं रोपटं आहे.
खुप काही मिळविण्याच्या प्रयत्नांत आपण खूप काही गमावून बसलो आहोत हे समजलच नाही कधी..माणसांपेक्षाही तंत्र विकसित झाली आणि त्यापेक्षा माध्यमं ..माध्यमांमुळे माणसाच्या विचार - अविचारांचं मिश्रण झालं-मी म्हणेन वैचारिक प्रदूषणच!. हाच आमच्या जगण्यातला अंधार . विचार हरवलेत-संस्कृती धास्तावली- माणसं दुरावली - आता मला भीती वाटते हे इवलसं जग (?) नाहीसं होण्याची..!
या दिपावलीच्या निमित्ताने नवनिर्मितीच्या क्षणांना माझं हेच मागणं आहे.. आता हा उजेड आभाळभर ओसंडून वाहू दे...असाच कोसळू दे हा उजेडाचा पाऊस...अन दिव्यांचं स्वतः होऊन जळत रहाणं प्रेरणा होऊन आमच्या आयुष्यात येऊ दे... नकळत या सणाच्या सीमेवर विरघळत जावो अंतःकरणातले धुसर तसे गडदही, पण साचलेले दांभिक विचार...अन उजडो एक नवं प्रज्वलित कोमल किरणांचं साम्राज्य...नवा प्रहर अर्थात तेव्हाच साजरा होईल खरा 'दिपोत्सव......!'
- कृष्णा बेलगांवकर
No comments:
Post a Comment