Dainik Lokmat, Ahmednagar, August 2014
सहज डायरीचं पान उलटलं - निरव शांततेत अचानक कसलातरी आवाज व्हावा अन भयभीत पाखरांनी मिळेल त्या दिशेला झेप घेऊन पळावं, तसे अनेक क्षण डोळ्यांसमोर तरळले ...थोडे गतकाळातले -घडून गेलेले ; थोडे आजही घडत राहिलेले...! ती ग्रीष्मातली सकाळ...चिंब भिजलेलं शहर...रस्त्यावरची गर्दी...रिक्षाचे हॉर्न...चौकातले पोलिस...रस्त्यालगतची चहाची दुकानं...त्याच भिजक्या वाटेवर अलगद पावलं टाकत कॉलेजला येणारी पोरी - पोरं...अन एखाद्या सौंदर्यवतीनं लाजून बसावं, तसंच हिरव्यागर्द झाडीत दडून बसलेलं 'न्यू आर्ट्स कोलेज'...!

पत्रकारितेच्या निमित्तानं शहरात आलो अन कॉलेजशी नातं जोडलं गेलं. मनात नसतानाही एम.एस्सी.ला प्रवेश घेतला अन प्रवासाची वाटच बदलली. ऑफिसमधल्या सहका-यांऐवजी भोवताली मित्र-मैत्रीणींचं वर्तुळ वाढत गेलं. मग एखाद्या तरुण कवीनं शीळ वाजवत बागेत फिरावं तसंच कॉलेजला यायचो मी. नवी - कोरी हर्कुलीस होतीच सोबत. एखाद्या वादळानंतर सूर्यानं पूर्वेकडून उगनंच सोडून द्यावं, तसा कधीही-कुठूनही यायचो मी कॉलेजात! ' सारे रस्ते आपल्याच बापाचे ' असं तेव्हा मनात नव्हतं, तेव्हढंच आता बरं वाटतं. सकाळीच विशाल गणपतीला जायचं, अन कॉलेज सुटल्यावर नाटकाच्या रिहर्सलला ...कधी कधी आकाशवाणीलाही बडबड करायची, याशिवाय शहरातली सांस्कृतिक चळवळ , गणेशोत्सव , नवरात्र आणि उरल्या वेळेत 'कॉलेज कट्टा !' खरं म्हणजे 'राजकारण' सोडलं तर सारंच भावलं या शहरातलं...अन सगळ्यांत जास्त भावला तो धो - धो कोसळणारा भीजपाऊस !
![]() |
| MR. Krishna |
कधी कधी दिवसभर आभाळ झाकोळून यायचं अन कुढत बसलेल्या तानुल्या पोरानं एकाएकी खुदकन हसावं तसा अचानक तो सुरु व्हायचा ...कॉलेज समोरचं भलं-थोरलं गुलमोहोराचं झाड मनसोक्त अन रुबाबात न्हाताना दिसायचं. मग पुन्हा निघायचो मी रेंजर सायकल घेऊन त्या पावसात फेरफटका मारायला..चितळे रोड , कापड बाजार, नगर कॉलेज,चांदणे चौक , डी.एस. पी. ते पत्रकार चौक. छे! पोलिसमामासुद्धा नाद करायचे नाहीत-सायकल कशाला अडवतील ते? मग जायचं वस्तीगृहात, अंघोळ करून कपडे बदलायचे, तितक्यात मैत्रिणीचा फोन - 'गरम-गरम भजे खायला जायचं'. याची आपली रिमझिम चालूच..कॉलेज समोरची रंगी-बेरंगी पोरांनी गजबजलेली कॅन्टीन ..भज्यांचा खमंग सुवास...दोघांत एक प्लेट मुद्दामहुन मागवायची..! अरे आजही नाद नाही त्या भज्यांचा...चहाचा तर मोहच सुटत नाही. मग पुन्हा धो-धो पाऊस...माझ्या काळजीनं तिनं आणलेली एकुलती एक छत्री. पण मला छत्री नाही, पाऊस आवडतो..छत्री बंद..पाऊस चालू..दोघेही ओलेचिंब ....सोबत भिजलेलं शहर...भिजलेले रस्ते...झाडाखाली पाऊस चोरून थांबलेली आम्हाला पाहणारी गर्दी...अन जणू फक्त आमच्यासाठीच कोसळत राहणारा आमचा जिवलग... भिजपाऊस !
क्षणात डायरी बंद केली- गतकाळातला भिजपाऊस डोळ्यांतून पाझरला आज. तेव्हाचे भिजलेले रस्ते...भिजलेलं शहर...अन भिजलेले कपडे..सारं सुकून गेलं असेल पण त्या आठवणी? - आजही भिजक्याच आहेत त्या ! मनाच्या खोल जलाशयात तरंगणाऱ्या त्या आठवणींचं कधी गोठून शिंपलं तरी का होऊ नये?
कॉलेज सोडलं, त्यानंतर शहरच सोडलं...तो 'जिवलग' पुन्हा भेटलाच नाही कधी.....!
- कृष्णा बेलगांवकर

No comments:
Post a Comment