Saturday, 7 February 2015

मनाच्या गाभा-यातून...

                                                                                              Dainik Lokmat,Ahmednagar August 2014 
      
      खिडकीतून थंडगार हवेचा झोत आल्यानं अचानक जाग आली. रात्रीचे दोन वाजले - गाडीनं नुकतंच सातारा शहर मागे टाकलं होतं. रस्त्यावर कोसळणारा पाऊस छेदत गाडी बेफाम वेगानं कोल्हापूरकडे निघाली. पावसाचा गारवा थोडा त्रासदायक वाटल्यानं मी खिडकी अर्धवट बंद केली...रात्रीच्या मध्यान्ह काळोखात  पाऊस चांगलाच रमला होता...अन रात्रही भिजकी होत त्याला साद घालत होती...
          बागेतल्या नुकत्याच उमलणा-या कळीवर एखाद्या फुलपाखरानं अलगद येउन बसल्याची जाणीव व्हावी तसाच एक विचार मनात आला- कुणाशीतरी मनसोक्त बोलावं या पावसाबद्दल ! पण दुस-याच क्षणाला जाणीव झाली या मध्यान्ह रात्री नेमके कुणाशी बोलणार आपण ?  कॉल करावं म्हटलं तरी हि वेळ योग्य नव्हती.अन खरं म्हणजे प्रश्न वेळेचा नव्हताच..प्रश्न होता बोलण्याचा...! हल्ली या जगात मनसोक्त असं बोलतच नाही कुणी ! कधीच नाही..मग ती वेळ मध्यान्ह रात्र असो कि गजबजलेल्या वाटेनं सरकत सरकत मावळणारा दिवसही ! खूपच ब्युझी झालोत आम्ही काहीतरी कमावण्यात...पैसा, स्टेटस..आणि  बरंच काही न सांगण्यासारखं. मला इतकंच आठवलं - रात्री एस.टी.त बसल्यावर गाणं गुणगुणत नगर शहर सोडलं होतं...पण आता याच वाटेवर पाऊस भेटल्यानं मोह होत होता कुणाशीतरी बोलण्याचा. क्षणभर एक अजब गोष्ट मनात आली कि, स्वतःच स्वतःला  कॉल करावा अन केलाही पण व्यस्त असल्याचं सांगितलं..खरंच यार..किती अजब गोष्ट आहे ना ! आपण कुणाचाही नंबर डायल करू शकतो हवं तर पण स्वतःचा नंबर नेहमीच व्यस्त असतो स्वतःसाठी..म्हणजे जगात कुणाशीही आपण बोलू शकतो पण स्वतःशी कधी बोलायचं म्हटलं तर...? किती मार्मिक वाटतोय हा क्षण मला ! मी ठरवलं आता स्वतःशीच बोलायचं फक्त....
       अर्धवट झोपेत असताना कुणीतरी शेजारी येउन निजावं तशी एक - एक आठवण येऊ लागली मनात...मग आठवत गेलं त्या झिम्माड पावसात भिजत-भिजत वाहिलेलं अल्लड बालपण...चिखल होऊन पायाशी दरवळलेल्या मातीचा सुवास..थोड्याश्याच पावसानं भिजकी होणारी पण तितकीच घट्ट असलेली मातीची घरं..घरांचं अंगण..अंगणातली वाळू ...पाखरांची घरटी..तुटलेली..तुटणारी...पुन्हा फांदीवर डोलताना दिसणारी..मध्येच कधीतरी शहाणपण शिकवणारी शाळा ..मास्तर...शाळेतले दोस्त...खेळण्यापेक्षा भांडणंच जास्त  पण मनातून अखंड प्रेम करायला शिकवणारे ते दिवस..आठवत गेला तो ग्रीष्म..आषाढ..अन श्रावणही -  साज-या केलेल्या उत्सवांसोबत ! एखाद्या सुवासिनीने वारुळाला पुजावं तसं 'शिकून मोठा साहेब हो' म्हणत तोंडावरून मायेचा हात फिरवणारी म्हातारी माणसं अन खरोखर मोठं होण्याच्या खुळचट ओढीनं  झपझप चालत शाळा - कॉलेज-नोकरीपर्यंत पोचलेलो आपण ! ....आठवत राहिलं पहिलं लेक्चर...पहिली कविता..पहिलं प्रेम..पहिलं ऑफिस ...ऑफिसातली खिडकी अन खिडकीबाहेर कोसळत असलेला धो -धो पाऊस ! तसाच बोलत राहिलो आठवणींसोबत.....भिजण्याची ओढ असतानाही भिजू शकत नव्हतो..अन बोलण्याची इच्छा असतानाही गप्प राहिलेला मी...!
         खरं म्हणजे या आठवणींच्या रुपानं बोलतच राहिलं आयुष्य तेव्हा...! अन  आपल्याच आयुष्यानं आपल्याशी बोलावं असा अफलातून क्षण मिळणार तरी केव्हा..? फारच दुर्मिळ ! कारण आम्ही गुंतत चाललोय - टी.व्ही., इंटरनेट अन फेसबुकच्या जाळ्यात. होय आम्ही तासंतास चाटिंग करतो समोर कोण आहे हे  माहित नसलेल्या, कदाचित फेक असलेल्या अकौंटशी! पण आम्ही कधीच बोलत नाही स्वतःशी. तासंतास ...दिवसेंदिवस..अन वर्षानुवर्षे..मची आमच्याशीच नसते होत गाठ-भेट...म्हणूनच आम्ही नाही गाऊ शकत स्वच्छंदी पाखरांसारखं..नाही बागडू  शकत मोरांसारखं आभाळ भरून आल्यावरही...शरीराला खूप सुखं दिलीत पण मनाला आम्ही कधीच विचारलं नाही- तुला काय हवंय म्हणून ? कधी कधी वाटतं दुसर्याशी बोलण्यासाठी नेटवर्क  शोधत खूप दूर गेलो आपण..पण स्वतः पर्यंत पोहोचायचं राहूनच गेलं....!
        पहाटेच्या धुसर - तांबड्या प्रकाशात दोन पाखरं उडताना दिसली...माझी हिरकणी..आता हिरव्यागर्द कोल्हापूर शहरात येउन थबकली होती...भोवताली रस्त्यावरची गर्दी पाहून क्षणभर  वाटलं..आपल्या आतही  अश्या अनेक चेहऱ्यांची गर्दी असते ना! फरक इतकाच कि आपण त्यांना ओळखत नसतो..कारण ते चेहरे असतात आपल्या...चंचल...बाव-या..अबोल कधी बोलक्या मनाचे ..!
                                                                                                                 -  कृष्णा बेलगांवकर 

No comments:

Post a Comment